Wednesday, 8 July 2015

Hatgad Fort

माझा  आधीचा ब्लॉग  वाचा.
Achala Fort अचला  किल्ला 

                                                   ॥    किल्ले हतगड  ॥ 

भेटीची तारीख: ८ जुलै २०१५
Day 1: Fort 3

                           सचिन आणि देवराम यांचा निरोप घेऊन आम्ही हतगडाकडे निघलो. हतगड हा किल्ला पिंपरी अचला या गावापासून पुढे अंदाजे २० किमी अंतरावर सापुतारा कडे जाणाऱ्या हायवेवर बोरगांव नावाच्या गावाजवळ आहे. या गावापासून बरोबर २ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला अगदी हायवेला लागूनच आहे. त्यामुळे की काय माहित नाही पण गाडी किल्ल्यावर जायला रस्ता आहे. याच किल्ल्यावर शिवजीमहाराजांनी सुरतेची लूट ठेवली होती.
पिंपरी अचला वरुन बोरगांव कडे जाताना मधे छोटासा घाट लागला. या घाटात काही बायका जांभळे विकत होत्या. आंम्ही त्यांच्याकडून जांभळे विकत घेतली. आम्ही ट्रेकला गेलो की नेहमी बिया सोबत घेतो. पण या वेळी मी जमा केलेल्या बिया घरीच विसरले. त्यामुळे खरतर बरच झाले की आम्ही निदान या विकत घेतलेल्या जांभळांच्या तरी बिया वर किल्ल्यावर टाकू शकू. आम्ही सगळ्या बिया नीट एका पिशवीत जमा केल्या.
प्रदीपने सहज आश्चर्य व्यक्त केले की हा दोन राज्यांना जोडणारा रस्ता असूनही हा दोन पदरी कसा? संदिप त्याला म्हणाला हा जरी दोनपदरी आहे तरी खूप चांगल्या अवस्थेत आहे. बाहेर हिरवागार परिसर, छान मोकळा रस्ता आणि पावसाळी वातावरण पण जास्त पाऊस नाही. संदिप खरच ड्राइविंग एन्जॉय करत होता.
लवकरच आम्ही बोरगांव ला पोहोचलो. तिकडे आम्ही किल्ल्याचा रस्ता विचारला. लोकांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. आणि आम्ही लवकरच किल्ल्यापाशी आलो.

हाएवे वरून दिसणारा हतगड 
बऱ्यापैकी शाबूत असणारा बुरुज आणि तटबंदी 
अगदी पायथ्यापासून जरी चढायला सुरुवात केली तरी अगदी २०-३० मिनिटांत वर पोहोचता येते. पण आम्ही गाडीनेच वर गेलो. वर गेलो तेव्हा काही पाथरवट लोक दगड कोरत होते. मी लगेच संदिपला म्हणाले आपल्याला पाटा आणि वरवंटा घ्यायचा आहे. गाडीतून खाली उतरलो तेव्हा काही ते वेगळेच करत होते. ते फ़क्त दगड तासत होते. मग संदिपने त्यांना विचारले की तुम्ही हे का तासत आहे तेव्हा ते म्हणाले की आम्ही पायऱ्यांसाठी दगड तासत आहो. तरी मी पुन्हा संदिपला म्हणाले त्यांना विचार की ते पाटा वरवंटा बनवून देतील का तोवर आपण गड बघून येऊ. लगेच संदिपने त्याचा पेटेंट डायलॉग म्हणला "या बायकांना कुठे काय घ्यावे ते कळतच नाही. शॉपिंगची एकही संधी सोडत नाही. आता चार दिवस ट्रेकला आलो तर काय पाटा वरवंटा घेऊन जायचे का?" पण मी त्याकडे दुर्लक्ष करून त्या लोकांना विचारले की तुम्ही दयाल का बनवून पण ते लोक नाही म्हणाले. आणि संदिपच्या पाट्यात वरवंटा आला I mean जीवात जीव आला. ;)
आम्ही गडाकडे चालयला सुरुवात केली. लगेच आम्हाला गडाच्या तटबंदीकडे जाणाऱ्या पायऱ्या लागल्या. त्यांची नुकतीच डागडुजी झाली होती तर काही पायऱ्यांची चालली होती. गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत. या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.



दगडी पायर्यान्नंतर लागणारी जुनी वाट 

मुख्य दरवाजा (थोडी पडझड झाली आहे )

बुजलेल्या अवस्थेत असलेली गुहा 
 या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावरआम्ही  दुसर्‍या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगद्या सारख्या दरवाज्यातून आत शिरलो. या दरवाज्याची ठेवण हरीहर किल्ल्याच्या दरवाज्या सारखीच आहे. या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे. लोकांनी तिथे घाण करून ठेवली अहे.  यात पाण्याची तीन टाकी आहेत. या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. दरवाज्यातून वर आल्यावर पायर्‍यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे, ती आजही बर्‍यापैकी शाबूत आहे. समोरच एक पीर आहे. येथे सुद्धा वाऱ्याच्या शक्तीचा आम्ही अनुभव घेत होतो. संदिपने माझा विडिओ पण काढला मी फक्त उभी होते आणि वाऱ्याने हलत होते. एकडून सापुतारा अगदी ७-८ किमी अंतरावर असेल. या स्पॉट वरुन सापुताऱ्याचे सुंदर दर्शन होते.


कातळात कोरलेली वाट (उजव्या बाजूला कोरलेल्या गुहा आहेत.)


अश्या भुयार वजा असणारी किल्यावर येणारी एकमेव वाट 

 उजव्या बाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे. हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे. आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी. येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते. संदिपच्या कॅमेऱ्याची एक प्लास्टिकची पिशवी नेमकी या पाण्याच्या टाक्यात पडली, आम्हाला घाण अजिबात करायची नव्हती म्हणून आम्ही काढण्याचा खुप प्रयत्न करत होतो. आजूबाजूच्या लोकांना वाटले की आमचे काहीतरी अती महत्त्वाची वस्तु पाण्यात पडली आहे. पण जेव्हा त्यांना कळाले हा सर्व खटाटोप एका प्लॅस्टिकच्या पिशविसाठी आहे तेव्हा ते आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. पण आम्ही त्यांना सांगितले की आम्ही गडावर अजिबात घाण टाकत नाही.



थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात. येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव आहे. यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे. तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार आहे. या पठारावर प्रदीपने जांभळाच्या बिया लावल्या. आशा आहे की तिथे आता झाडे आली असतील. किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे. तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसर्‍या टोकाला जाते. वाटेत पाण्याची अनेक टाकी लागतात. गडाच्या दुसर्‍या टोकाला एक बुरुज आहे. संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो. प्रत्येक स्पॉटवर फोटोग्राफी करून आम्ही पुन्हा गाडिपाशी आलो आणि वणी कडे निघालो. वणीत आमच्या रूमवर ४ ला पोहोचलो.   
असा हा सुंदर हातगड नाशिक पासून ७४ कि.मी अंतरावर आहे. नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.


गडावरील अवशेषांचे फोटोज खालील प्रमाणे. 
बऱ्याच प्रमानात चुना वापरलेली बांधकामे अजून शाबूत आहेत.


















किल्ले अहिवंत  (Coming soon...)



Main page मुख्य पान 




No comments:

Post a Comment