Thursday, 9 July 2015

Ahiwant Fort

माझा  आधीचा ब्लॉग  वाचा.
Hatgad Fort हतगड  किल्ला

    अहिवंत किल्ला    


भेटीची तारीख: ९ जुलै २०१५
Day 2: Fort 1


                          सकाळी ६ वा. उठून आम्ही तयार झालो. रूम सोडायला ६.३० झाले होते. आम्ही वणी मध्ये चहासाठी न थांबता हायवे वर चहा घ्यायचे ठरवले. सोबत आम्ही बिस्किटस घेतले होते ते खाल्ले.
सकाळी ७ ला आम्ही पुन्हा पिंपरीपाडा येथे आलो. सचिन व देवराम तयारच होते. त्यांना घेऊन आम्ही पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर कोल्हेर गाव लागते, त्याच्याही पुढे साधारण २-३ किमी. अंतरावर एक गाव लागले. या गावातून सचिन एका जाणकार माणसास घेणार होता. पण तो बाहेर गेला होता. अजुन एका माणसाने सल्ला दिला की या वाटेने (अहिवंत वाडीच्या ) न जाता दरेगांव च्या वाटेने जा. कारण पावसाचे वातावरण होते व खडया चढणीचा रस्ता होता. चढाई अवघड होती. अहिवंत किल्ल्याचा विस्तार खूप मोठा असल्याने तेथे जाण्यास अनेक वाटा आहेत. अहिवंत वाडी या गावातून पण एक वाट आहे. आणि एक वाट दरेगांव मधून आणि तीसरी वाट दरेगांव खिंडीतून जो रस्ता बेलवाडी मध्ये जातो तिथून आहे.
या सर्व वाटांपैकी दरेगांव खिंडीतील वाट सर्वात सोपी आहे. एका गावकऱ्याने तर असेही सांगितले की वाट येवढी सोपी आहे की म्हशी पण याच वाटेने जातात. संदिप त्यांना म्हणाला आम्हाला पण एक म्हस वर न्यायची आहे. so wicked… असो या वाटेने गाडीने बऱ्यापैकी वर जाता येते. त्यामुळे अंदाजे १-२ किमी चढायचे वाचतात. पण आम्हाला पूर्ण गड बघायचा होता. म्हणुन आम्ही दरेगांव येथील वाटेने चढून खिंडीच्या वाटेने उतरायचे ठरवले. अहिवंत किल्ल्याचा आकार इंग्रजी "U" सारखा आहे. आणि बरोबर मध्ये दरेगांव आहे. बहुधा दरी मधील गाव म्हणजे दरीगाव असावे नंतर कालांतराने त्याचे नाव दरेगाव असे पडले असावे.
                  खरतर हे दरेगांव वणीमधून सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या हमरस्त्यावरच आहे.  पिंपरी पाड्याकड़े जायची गरज नव्हती. पण सचिन आणि देवराम यांना सोबत घेण्याचे आदल्यादिवशी ठरवल्याने  तेथे जावे लागले. शिवाय आमच्या कालच्या योजनेप्रमाणे आम्ही अहिवंत वाडीवरून चढाई करणार होतो, असो.
                  दरेगांवात पोहोचल्यावर गाडी तेथील शाळेजवळ लावून वर जाण्यासाठी लागणारे साहित्य एका बॅगेत भरून चढायला सुरुवात केली. थोडा रस्ता शेता शेतातून  होता. सर्वत्र पोपटी हिरवळ होती. चढण आता खडी होत होती. आम्ही झपाट्याने ऊंची गाठत होतो. आमचा खर तर माझा वेग मंदावत होता. खरतर जी वाट होती ती पाण्याच्या ओहळामुळे बनली होती. शिवाय हलका हलका पाऊस पडला होता. त्यामुळे काही ठिकाणी थोडी निसरडी होती. आजुबाजुला करवंदची जाळी होती. जनावरांचा अपवाद वगळता आमच्या ५ जणांव्यतिरिक्त आजूबाजुला कोणीच नव्हते.
           साधारण २०-२५ मिनिटाच्या चढाई नंतर आम्ही एका छोट्या सुळक्यापाशी आलो. या सुळक्याला डावीकडे ठेवत  पायवाटेने आम्ही आधी थोडे उतरून आणि मग परत दोन सुळक्यांच्या मधल्या घळईतून वर चढलो. वर चढल्यावर आम्ही बरोबर दोन सुळक्यांच्या पायथ्याशी होतो. डावीकडच्या कडयाला वर चढायला पायऱ्या होत्या पण त्या फारच अवघड होत्या. पहिल्या दोन पायऱ्या तर चांगल्या पुरुषभर उंचीच्या होत्या. मी थोडा प्रयत्न केला पण शक्य होत नव्ह्ते. चढले तरी उतरणे तितकेच अवघड होते. वरील काही पायऱ्या तर अगदी अरुंद होत्या आणि शिवाय बाजूला आधाराला पण काही नव्ह्ते. मला एक दोन वेळा सगळ्यांनी थोडे encourage केले. पण तरीही मला जमले नाही चढायला.
पहिली टेकड़ी चढून वर आल्यावर दिसणारा सुळका  

शेवटी मीच त्यांना म्हणाले तुम्ही जा मी नाही येत. सगळे वर गेले. आता मै और मेरी तनहाई.... too filmy ना
पण खरच मी ती शांतता अनुभवली होती. अंगावर शहारा आणणारा वारा होता. समोरच कडा असल्याने वाऱ्याचा पण आवाज घूमत होता. समोरचा कडा खूप राकट भासत होता. मध्येच जोराचा वारा आला आणि मला हलवून गेला. झाडांच्या पानांची पण सळसळ झाली. एखाद्या हॉरर फिल्मचा सीन वाटतोय ना आणि मी त्यातील हिरोईन. फिदीफिदी फिदीफिदि…
            पण खरा सांगायचे तर मी पण थोडी घाबरले होते. मी पुन्हा एकदा सहज पायऱ्या चढायचा प्रयत्न केला. पहिली पायरी कशीबशी चढले पण पुढे चढता येईना. शेवटी मी नाद सोडला आणि वर गेलेल्या मंडळींची वाट बघू लागले. नंतर माझ्या लक्षात आले की मी तिथे डोळे मिटून ध्यान करून निसर्गाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला हवा होता. आमच्या योगा क्लास मध्ये सांगतात तसे just be with yourselves. पण तेवढयात सर्व मंडळी परतली.
            मी त्यांना उत्सुकतेने विचारले वर तुम्ही काय काय पाहिले, मला जाणून घ्यायचे होते मी काय काय मिस केले. संदिपने सांगितले वर तो कडा नसून मोठा टेहळणी बुरुज आहे. वर पाण्याची दोन टाकी आहेत . एका टाक्यात उतरायला छान मोठ्या पायऱ्या आहेत आणि याच टाक्यामध्ये आतल्या बाजूला राहता येईल अशी जागा-गुहा असावी, बहुदा ते टाके नसून पूर्वीचे सैनिकांसाठी निवाऱ्याचे ठिकाण असावे. कारण शक्यतो टाक्यांना पायऱ्या नसतात आणि आतल्या बाजूला जी जागा होती त्यावरून हे स्पष्ट होत होते. आता तिथे माती साचून आतला भाग बुजला आहे त्यामुळे ते टाके आहे असा भास होतो.  तिथेच त्यांना एक बुजलेली एक चोरवाट पण आढळली.त्या मध्ये उतरण्यासाठी सुस्थित अश्या पायऱ्या होत्या परंतु आत मध्ये माती साचली होती आणि चिखल झाला असल्याने आम्ही आत जायचे टाळले. - इति संदीप.
         

डाव्या बाजूच्या बुरुजावरून दिसणाऱ्या (किल्ल्यावरच्या) कातळात  कोरलेल्या पायऱ्या  

बुरुजावरून दिसणारे दरेगावच्या बाजूचे (नांदुरी पर्यंत ) विहंगम दॄश्य 

किल्ला आणि बुरुज यामधील काही क्षणचित्रे 
     


                                    किल्ला आणि बुरुज यामधील बांधकामाचे अवशेष 

                   आता आम्हांला समोरच्या कड्यावर जायचे होते. आम्ही चढून त्या कडयावर गेलो. आम्ही ज्या कडयावर  चढत होतो, तो आधीच्या कडयापेक्षा थोडा ऊंच होता. वर चढल्यावर तो आधीचा कडा एकदम आइसक्रीम कोन सारखा दिसत होता. आम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफी केली. पुढे गेल्यावर अजून एक सरळ कडा लागला. त्यावर चढायला कडयामध्येच कोरलेल्या सुंदर पायऱ्या होत्या. आम्ही सावकाश पायऱ्या चढून वर आलो. आता हळूहळू चढ कमी झाला होता. आम्ही आरामात चढून एका विस्तीर्ण पठारावर आलो होतो. पाऊस नव्हता पण खुप धुके होते. आम्ही धुक्यातून वाट काढत पुढे जात होतो. मधेच थोडे धुके निवळून आजूबाजूचा आणि खालचा परिसर दिसू लागायचा. आम्ही जणू ढगांत नाही तर स्वर्गात असल्याचा आभास आम्हांला होत होता.


किल्ल्यावरील पहिला व अहिवंत वाडीकड़चा कड़ा 

 धुके खूपच दाट होते, संदीपच्या अंदाजाने डावीकडे एक कडा असायला पाहिजे होता म्हणून आही मुख्य वाट सोडून डावीकडे गेलो. आणि बरोबर अहिवंत वाडीच्या दिशेने असणाऱ्या कड्याच्या टोकावर थांबलो. सकाळचे ९.३० वाजून गेले होते. आम्ही तेथेच बसून नाश्ता करायचे ठरवले. वणी मधून आदल्या दिवशीच ब्रेड आणि जॅम आणले होते. आम्ही ब्रेड जॅम खात असतांना वाऱ्यामुळे एक प्लास्टिकची पिशवी उडून कडयावरून खाली उडाली. आम्हांला खुप वाईट वाटले. अजाणतेपणी या ट्रेक मध्ये दुसऱ्यांदा आमच्याकडून प्लास्टिकचा कचरा झाला होता.
           नाश्ता आटोपून आम्ही थोडे पुढे आल्यावर आम्हांला एका पडक्या वास्तुचे अवशेष आढळले. आम्ही आता गडाच्या दुसऱ्या टोकाकडे निघालो होतो. डाव्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष आढळले. आम्हांला उतरायची वाट उजव्या बाजूला असल्याने संदिपने सचिनला उजव्या दिशेने चालत राहण्याचा सल्ला दिला. मधेच एक तळ लागलं त्याला डाव्या हाताला ठेऊन आम्ही पुढे झालो. धुक्यामुळे वाट सापडत नव्हती. पाऊस बऱ्यापैकी झाला असल्याने सगळीकडे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ झाले होते.  बरेच इकडे तिकडे भटकल्यावर आम्हाला एक छोटा टेकडी वजा उंचावटा दिसला. तो किल्ल्याचा मध्य होता. परंतु त्याच्या डावीकडून कि उजवीकडून जायचे यात शंका होती, संदीपच्या म्हणण्याप्रमाणे धुक्यात रिस्क नको म्हणून आधी confirm करू कि आपण योग्य वाटेवर आहोत कि नाही. शिवाय सचिन या वाटेने आला नव्हता यामुळे त्यालाही काही माहित नव्हते. म्हणून मग आम्ही पूर्ण उजवीकडे वळून जो पर्यंत कडा लागत नाही तो पर्यंत चालत  राहण्याचे  ठरवले. वाट सापडतीये कि नाही याने आम्ही सगळे जण घाबरलो होतो. शेवटी अजून थोड चालत केल्यावर आम्ही एका कड्यापाशी पोहचलो आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण आमचा captain (संदीप) खूष दिसत नव्हता, तो म्हणाला आपण दरेगावाच्याच कड्यावर आहोत हे नक्की करू कारण धुक्यामुळे आजूनही खालचे काही दिसत नव्हते. म्हणून त्याने नाईलाजाने मोबाईल मधील  GPS वापराचे ठरवीले. (नाईलाज यासाठी कि आत्तापर्यंत त्याने कधीहि वाट शोधण्यासाठी GPS वापरले नव्हते. Confidence दुसरं काय ). परत इंटरनेट/रेंज मिळेल कि नाही या मुळे अजून सस्पेन्स वाढला. शेवटी एकदाचे नक्की झाले कि आम्ही  दरेगावच्याच कडयावर आहोत. आता या कडयाच्या कडे कडेने जायचे होते.

किल्ल्याच्या मध्यावर असणारे मुख्य अवशेष 


या वाटेकडे चालत असतांना एक म्हशींचा कळप लागला. मी एका म्हशीकडे पाहून सहज म्हणाले की ही म्हैस जरा रोडवलेली दिसतेय. तर ती म्हैस अचानक माझ्या मागे आली. मी धूम पळाले. प्रदीप संदीपला म्हणाला जर ही फ़ास्ट चालली नाही तर तिच्यामागे म्हैस सोडत  जावू आपण… मग बघ कशी पळते. too bad..
तेवढयात संदिपने भर घातली "कोणत्याही स्त्रीच्या अंगकाठीवर टीका करू नये. अगदी ती म्हैस असो की अथवा माणूस." फिदीफिदी पण हे दोघेच…
             असो back too the story. आम्हांला जो रस्ता सापडला होता त्याच्या शेवटी पायऱ्या होत्या पण पायऱ्यांवर काटेरी झुडपे टाकून ठेवली होती. संदिप म्हणाला नक्की हीच वाट आहे ना… सचिन म्हणाला हो, त्याने अजुन माहिती सांगितली की या गावचे/ भागातले लोक पावसाळ्याचे चार महीने गुरे वरच ठेवतात. गुरे गड उतरु नये म्हणून वाटेवर काटे पसरवतात. आम्ही जरा काटे बाजूला करून पायऱ्या उतरू लागलो. आता धुके जरा जर कमी होऊ लागले होते. जरा खाली  उतरल्यावर काही गुहा दिसल्या. पण गावतले लोक त्यांचा वापर गोठा म्हणून करतात. अजुन खाली गेल्यावर थोडी सपाट वाट लागली. थोडे पुढे गेल्यावर पाण्याच्या टाक्या लागल्या. पुढे बरच चाललो नंतर मात्र तिथे लगेच कडा लागला. खाली जायची वाट दिसेना. संदिप आणि सचिन वाट शोधायला गेले. लांबुन आम्हांला अजुन दोन लोक दिसले. आम्हाला वाटले की ते ही आमच्या सारखे ट्रेकर्स असावेत. लवकरच त्यांनी आम्हाला गाठले. ते त्याच गावातील मुले होते. पण एव्हाना सचिनला वाट सापडली. मग आम्ही सगळे मिळून गड उतरु लागलो. काही ठिकाणी वाट थोडी निसरडी होती. थोडे खाली उतरल्यावर उतरणीला करवंदाच्या जाळ्या लागल्या. याच दरम्यान आम्हांला झाडीतून मोर उडत जातांना दिसला. मोर एवढा उंच उडू शकतो हे मी पहिल्यांदाच बघत होते.

   
       काट्यांनी बंद केलेली वाट, उत्तरेकडील सोंडेवरचे पाण्याचे टाके , पच्छिमेकडे दूर धुक्यात दिसणारा अचला


उतरण्याची वाट आणि तेथील गोठा, कड्यात असलेली एक गुहा 


दरेगाव व बिलवडी गावांना जोडणारी खिंड, खिंडीवरून दिसणारी किल्ल्याची सोंड 



 उतरण्याची वाट (बिलवाड़ी मार्गे आलो तर चढण्याची)


            खिंडीवरून दिसणारी किल्ल्याची सोंड 
         
           
              समोरच एक अजुन डोंगर दिसत होता. आणि या दोन डोंगरमधून जाणारी हीच ती दरेगांव खिंड. येथे रस्त्याचे काम चालू होते. आम्हाला वाटले येथूनच उतराचे असेल पण ते नविन भेटलेले मुलांनी उजवीकडचा रस्ता दाखवला. तो रस्ता पुन्हा शेता मधून दरेगांव येथेच जात होत. आता या रस्त्याने आम्ही गावातील डोंगर सोंडेच्या दुसऱ्या टोकाला उतरणार होतो. चढतांना जसा चढ़ जास्त होता तसेच उतरतांना उतारही तीव्र होता. पण ट्रेक मधील आमचा हा चौथा गड असल्याने माझाही वेग जरा वाढला होता. तरी सगळ्यांचा वेग माझ्या पेक्षा जास्तच होता. काही ठिकाणी मी थोडी मागे पडत होते. ५-१० मिनिटांतच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पण गाडी कडे पोहोचायला अजुन २ किमी तरी चालायचे होते. रस्त्याने शेतात काम करणाऱ्या बायका आमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होत्या. बहुतेक त्या माझ्याकडेच बघत असाव्या. पण तिकडे लक्ष दयायला वेळ कोणाला होता.  १२.३० ला आम्ही खाली पोहोचलो पोटात भुकेने कावळे कोकलत होते. साधारण १ वाजता आम्ही गाडी पाशी आलो. आम्ही आदल्यादिवशीच सचिनला त्याच्या घरी आमची जेवणाची सोय करून ठेवायला सांगितले होते. मग आम्ही पुन्हा पिंपरी अचला येथे आल्या रस्त्याने परत पोहोचलो.

             सचिनच्या घरी आलो. सचिनच्या आईने स्वयंपाक करून ठेवला होता. पण त्या शेतावर गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. येवढी भूक लागली होती त्यात अशा ट्रेकच्या ठिकाणी असे घरगुती जेवण मिळणे म्हणजे भाग्यच…
            पोटभर जेवण करून आणि सचिन आणि देवराम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
           आता आमचे पुढील ध्येय होते "मार्कंडेय"…




 
आता पुढील ब्लॉग मधे वाचा आमचा दूसरा गड "मार्कंडेय" . . .

Markendey Fort मार्कंडेय गड (Coming soooonnn.....)


Main page मुख्य पान 

No comments:

Post a Comment