Monday, 1 October 2018

"मला परीचे पंख मिळावे"

"मला परीचे पंख मिळावे" 
खरच लहानपणापासून वाटायचे आपल्यालाही असे परीसारखे पंख मिळाले तर किती मज्जा येईल. आपल्याला  पण आकाशात उंच उडता येईल. पंखांचे स्वप्न तर नाही झाले पूर्ण पण मला हवेत उडण्याचा अनुभव मात्र अनुभवता आला. अहो कसे म्हणून काय विचारता? स्काय डायविंग मुळे.. 
माझ्या आणि संदिप  दोघांच्या बकेट लिस्ट मध्ये स्काय डायविंग हा आयटम होताच. पण योग जुळून येत नव्हता. नाही म्हणायला आम्ही पॅराशूटचा अनुभव घेतला होता. तेव्हढेच मनाला समाधान.. फिदीफिदी.. 
आम्ही आता US मध्ये शिफ्ट झालोय आणि आमच्या परिवारात एका सदस्याची देखील भर पडली आहे. श्रीदिप उर्फ हर्ष म्हणजेच आमचा बोक्या.. आमचा लहान मुलगा... 
बरं मुद्दा असा की  आम्ही राहतो तिथे म्हणजे शार्लोट च्या जवळच सॅलिसबरी येथे स्काय डायविंग करता येते याचा आम्हाला सुगावा लागला. आता अडचण होती मुलांची.. आँ आँ  गैरसमज नका करून घेऊ..झाला अस्स तिकडे वयोमर्यादा होती कि १८ वर्षांपुढील मंडळीच स्काय डायविंग करू शकतात. झालं मग काय आमची जाई माऊ झाली नाराज. तिने सरळ तिच्या इंग्रजाळलेल्या भाषेत "Why only adults can have all fun?" अशा तक्रारीच्या सुरात असहकार पुकारला. आमचा हर्ष १.५ वर्षाचा असल्याने मला किंवा संदिपला त्याच्या जवळ थांबणे गरजेचे होते. मग आम्ही दोघांनी वेगवेगळ्या बॅच मध्ये स्काय डायविंग करायचे ठरवले. 
लगेच ग्रुपऑन वर डील शोधून थोडीशी सवलत पदरात पाडून घेतली. शनिवार दि. २९/०९/२०१८ ला दुपारी एक ला आणि २ ला असे बुकिंग केले... बुकिंग करण्याअगोदर संदीपने मला २-३ वेळा "धनू नीट करशील ना ग.. नक्की करू ना तुझे बुकिंग? " त्याने माझ्यावरच्या दाखवलेल्या या विश्वासाला पात्र ठरत मी पण ठणक्यात म्हणाले "अरे विचारतो काय? कर बिनधास्त माझं पण बुकिंग" फिदीफिदी .. 
मी आत्मविश्वासाने हो तर म्हणाले होते पण मनाची द्विधा मनःस्थिती होत होती. नाही नाही ते विचार येत होते. समजा मी विमानातून उडी मारली आणि दुसऱ्या एखाद्या डाइव्हरवर किंवा खालून जाणाऱ्या एखाद्या विमानावर जाऊन आदळले तर.. पॅराशुटचं नाही उघडले तर? मला काही झाले तर माझ्या पिल्लांचे कसे होणार असे बरेच जर तर करून मी माझ्या मनाची अशी समजूत घातली की "घाबरू नको धनू.. कर बिनधास्त काय नाही होत.. डर के आगे जीत है". 
अखेर शनिवारचा दिवस उजाडला. संदिपने आम्हाला अकरा वाजेपर्यंत रेडी व्हायला सांगितले होते. तसे आम्ही तयार झालो पण होतो. तरी पण गाडीत बसता बसता ११.३० झालेच. आम्ही वाटेतली कामे रद्द करून आमचा मोर्चा लगेच आमच्या मिशन कडे वळवला. आम्हांला पोहोचायला एक तास तरी लागणार होताच. 
"There were butterflies in my stomach" असा अनुभव घेत आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. आमच्या अगोदरच्या बॅचचे डायविंग चालू होते... तिथे पोहोचल्यावर काही कागदपत्रांवर त्यांनी आमच्या सह्या वगैरे घेतल्या. आम्ही आता आमच्या नंबरची वाट बघू लागलो. 
नंतर असे समजले कि एका बॅच मध्ये साधारण १८ लोक असतात. ते सगळ्या लोकांना हार्नेस घालून तयार करतात. थोडेसे हातवारे समजावून देतात. आणि मग ६ लोकांना एका वेळी विमानात नेऊन डायविंग करवतात. आणि मग पुढच्या ६ लोकांना घेऊन जातात. पण एक बॅच संपल्यानंतर मात्र ते थोडी १०-१५ मिनिटांची विश्रांती घेतात. 
वेळ जाता जात नव्हता. आम्हाला वाटले की ढगाळ वातावरण असेल त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्या वातावरणाला अनुकूल कपडे घातले होते. पण ऊन पडल्याने त्या कपड्यात ते असह्य होत होते. तरी आम्ही खुश होतो कारण ढगाळ वातावरण असते तर स्काय डायविंगची नीट मजा घेता आली नसती.  हर्षच्या कारामतींमुळे वेळ जरा तरी जात होता. 
जवळपास एका तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर माझे नाव पुकारले गेले. त्या ट्रेनरने मला त्याची ओळख करून दिली. आणि सराईतपणे सगळे हार्नेस घालून मला तयार केले. २ मिनिटात एक गाडी आली. हार्नेस घातलेले काही  लोक त्यावर चढले. मला वाटले आता तो क्षण आलाच. मी जाईचा,हर्षुचा आणि संदीपचा निरोप घेतला व गाडीकडे जाऊ लागले. तेव्हढ्यात माझा ट्रेनर आला आणि म्हणाला आधी हे ६ लोक डायविंग करतील मग तुझा नंबर मग काय माझा पोपट झाला.. पुन्हा काही वेळ प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हताच. 
माझ्या आधीच्या लोकांचे विमान उडाले आणि अंदाजे १० मिनिटातच आकाशात पॅराशूट्स दिसू लागले. पण दुर्दैवाने सूर्य डोक्यावर असल्यामुळे मला फ्री फॉल काही दिसला नाही.
काही मिनिटातच ती मंडळी एक एक करून खाली आली. माझ्या हृदयाची धाकधूक वाढली. पुढच्या काही क्षणातच माझ्या ट्रेनरने आता आपला नंबर असल्याचे सांगितले. मी पुन्हा सगळ्यांना (अर्थात माझ्या घरच्यांना फिदीफिदी.. ) आलिंगन देऊन त्यांचा निरोप घेतला. 
विडिओ रेकॉर्डिंग चालू करतांना तुला कसे वाटते आहे असे त्याने मला कसं वाटतंय. मी  काय सांगणार? मी त्याला म्हणाले मी excited आहे पण मी घाबरले पण आहे. तर मला तो म्हणतो कसा अगं मी पण तर घाबरलोय..(फिदीफिदी). 
माझ्या बरोबर स्काय डायविंग करणारे सगळे एकेक करून विमानात बसले. विमानात सर्वात शेवटी मी चढले. विमानात बसायला साधा बेंच होता. त्याला सीट बेल्ट वगैरे काही नव्हतं. आम्हांला घाबरावयाला कि काय कोण जाणे पण त्या ट्रेनरने दरवाजा उघडाच ठेवला. हळूहळू विमानाने वेग घेतला तरी हा पठ्ठा काही दार बंद करायला तयार नाही. मी अगदी दरवाज्यापाशीच असल्यामुळे मला भीती वाटू लागली. अखेर टेक ऑफ करतांना त्याने दार बंद केले. पण थोड्याच वेळात त्याने तो पुन्हा उघडला. आता आम्ही अंदाजे ८ ते ९ हजार फुटावर होतो. त्याने मला गंमतीने विचारले काय मारायची का उडी.. मी म्हणाले आपण १२ हजार फुटावर पोहोचल्यावर मारू की.. इतकी भीती वाटून सुद्धा माझ्यात एवढा आत्मविशास कुठून आला काय माहित? मनात म्हणलं धनू आत्मविशास चांगला पण अती आत्मविश्वास नको. मी पुढे बसले असल्याने मी त्याला विचारले आपणच पहिले उडी मारणार का तो म्हणाला हो.. मी म्हणाले आपण दुसरी उडी मारू. त्याने माझी भीती ताडली असावी. तो लगेच हो म्हणाला. 
नंतर त्याने माझ्या हार्नेसचे हुक त्याच्या हार्नेसच्या हुकात अडकवले. ते नीट घट्ट बसले आहे कि नाही त्याची खात्री त्याने केली. तोवर माझ्या अगोदरच्या माणसाने आणि त्याच्या ट्रेनर ने उडी मारली होती. आम्ही लगेच दरवाज्यापाशी आलो. वरून अतिशय सुंदर दृश्य दिसत होते. सर्वत्र हिरवळ, सुंदर आणि आखीव रस्ते, घरांची छपरे, शहराजवळील एरवी निळी दिसणारी पण पावसामुळे तांबूस दिसणारी तळी.. 
मी याच नादात असतांना अचानक मी पडतेय असे जाणवले. मी जवळ काही धरायला आहे का ते चाचपडू लागले. .. नंतर लक्षात आले कि आम्ही उडी मारली आहे आणि आपण उडतो आहे. माझे लहानपणीचे परी सारखे उडायचे स्वप्न खरे होत होते. एक क्षण असे वाटले असेच उडत जाऊन माझ्या मातृभूमीला, आई-दादांना माझ्या स्वकीयांना भारतात जाऊन भेटून यावे. 


आणि तेव्हढ्यात माझे तोंड सूर्याकडे आणि पाठ जमिनीकडे झाली. फ्री फॉल असतांना आपण कसेही उलटे पालटे होतो. मग त्या ट्रेनर ने त्याच्या पाठीवरील  असलेली, छोट्या पॅराशूट सदृश्य बॅग उघडली मग माझे तोंड पुन्हा जमिनीकडे आणि पाठ सूर्याकडे झाली. आम्ही ढगांच्या मधून जात होतो. माझ्या डाव्या हाता वरच्या कॅमेरा वर व्हिडिओ आणि फोटो येणार होते.(व्हिडिओ रेकॉर्डिंग कंटिन्यू होणार होते आणि दर सेकंदाला एक फोटो येणार होता.) वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अंगावरची त्वचा आणि गालफडे सुद्धा उडत होते. नाकपुड्यांमध्ये हवा जाऊन उगाच मोठ्या झाल्यासारखे जाणवले. मला तोंड घट्ट मिटून घ्यायला सांगितले होते पण स्त्री जातीला याची सवय नसल्याने ते मी उघडलेच होते. तोंडात हवा भरली गेली. नंतर कळले कि तसे नको होते करायला माझे फोटो भयंकर आलेत ..फिदीफिदी .. 
जमिनीतील आणि माझ्यातील अंतर झपाट्याने कमी होत होते. जणू धरणीमाय मला दोन्ही हात पसरून बोलावत होती आणि मी देखील तिच्या सादेला ओ देऊन दोन्ही हात पसरून तितक्याच आवेगाने (अंदाजे ताशी १२० miles ) तिच्या आलिंगनाला जात होते. 
अचानक एक छोटा हिसका बसला आणि माझा वेग मंदावला. घो घो वाहणारा वारा शांत झाला. आणि मी पुन्हा थोडी वर गेले. आमचे मुख्य पॅराशूट उघडले गेले होते. (एक बॅकअप पॅराशुट पण होते)
पॅराशूट उघडल्यामुळे हायसे वाटू लागले. मी पुन्हा वरून सृष्टी सौंदर्य न्याहाळू लागले. नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे धरणीमाता नुकत्याच न्हाऊन आलेल्या आणि केस वाळवत बसलेल्या एखाद्या सुंदर तरुणी सारखी दिसत होती. 

माझे हे विचारचक्र चालू असतांना माझ्या मांडीवरचा बेल्ट अचानक आवळला जातोय आणि माझ्या पोटावरचा बेल्ट छातीवर गेल्याचे जाणवले. त्यातच आम्ही पुन्हा एक गिरकी घेतली. मी निघण्याअगोदर संदिप  माझ्या ट्रेनरला म्हणाला होता जर तू एकटाच परत आला तर मी तुला दुप्पट पैसे देईल. एक क्षण वाटले ह्या माठ्याने खरंच ते मनावर तर नाही ना घेतले कारण अजून आम्ही जमिनीपासून ४-५ हजार फुटांवर होतो. 
आम्ही पुन्हा हवेत एक गिरकी घेतली. मला पुन्हा मांडीवरच्या बेल्ट मुळे एक चिमटा बसला.(आणि पुढचे दहा-बारा फोटो खराब आले) आजूबाजूचा परिसर बघून आम्ही खाली येऊ लागलो. मला आता भीती वाटू लागली जर बेल्ट निसटला तर... नंतर तो बेल्ट अधिकच आवळला जाऊन जोरात चिमटा बसू लागला.. मला कधी एकदाची जमिनीवर पोहोचेल असे झाले. मग सगळे स्पष्ट दिसू लागले. रस्ते, रस्त्यावरची शिस्तबद्ध वाहतूक वगैरे सगळे.. पणआमचे उतरायचे ठिकाण दिसत नव्हते.. परत वाटले हया माठ्याने मला भलतीकडेच नाही ना आणले.. रस्त्यावर उतरवणार का काय मला? तेवढ्यात मला सर्वप्रथम पार्किंग मध्ये उभी असलेली आमची गाडी दिसली. पार्किंग मध्ये गर्दी नसल्याने मला ती सहज ओळखता आली. मम्मा असा जाईचा आवाज कानावर आला. 
आता मी माझी अवकाश यात्रा संपवून, स्वप्नाच्या दुनियेतून पुन्हा माझ्या दुनियेत परतले होते. माझे सेफ लँडिंग झाले होते. उगाचच मी त्या ट्रेनरला माठ्या म्हणाले होते. .. मनात त्याची माफी मागत आणि वर त्याला माझे सुंदर स्वप्न सत्यात उतरावल्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानले. थोडे फोटो वगैरे पण काढले. लाखात एक अपघात होऊ शकतो पण आज माझा नंबर नव्हता या बद्दल देवाचे देखील आभार मानले. 
थोड्याच वेळात संदीपने देखील असाच थरारक अनुभव घेतला. त्याने मला त्याचे शूटिंग करायला सांगितले पण मी as  usual सगळे blunder केले. 
पुन्हा गाडीत बसून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सहज माझे लक्ष पुन्हा ढगांकडे गेले. काही क्षणांपूर्वी मी याच ढगांपलीकडे माझ्या स्वप्नविश्वात होते.... घरी येऊन पुन्हा नित्यकर्मात रममाण होत असतांना मन मात्र आनंदाने नाचत गात होते. "आज मैं उपर आस्मा नीचे"

12 comments:

  1. खूप छान लिहिले आहेस... मला पण मी तिथेच असल्यासारखे वाटले इतके गर्क करून टाकले होते.. खूप छान.. असाच लिहीत राहा.. !!!

    ReplyDelete
  2. छानच गं. वाचून मला पण कधी हा अनुभव घेते असा झालंय :)

    ReplyDelete
  3. Sunder lihilayes dhanu ...ani congrats ha thararak anubhav ghetlyabaddal

    ReplyDelete
  4. Sundar anbhavach sudar varnan kelel aahe👌👌👍

    ReplyDelete
  5. Dhanno,
    Kharach khup chhan lihile aahes. Wachtana majaa aali.

    ReplyDelete
  6. धनु, खूप छान लिहिलं आहे वाचुन आपणच sky driving करून आलोय असा वाटलं.

    ReplyDelete
  7. Chhaan lihilay Dhanashree.... Keep doing adventures.....

    ReplyDelete
  8. खूपच छान धनू, अगदी डिटेल सांगितले.

    ReplyDelete
  9. Dhanu - exciting experience and really well written.. mast

    ReplyDelete
  10. Very good detailed description.. enjoyable reading. Gr8 experience! Congratulations

    ReplyDelete