॥ चावंड (प्रसन्नगड ) ॥
आमच्या मागील रोमांचक ट्रेकला जवळजवळ महीनाउलटून गेला होता. पुन्हा आम्हाला एडवेन्चरचे वेध लगले. पुन्हा कोणतातरी गड आम्हाला साद घालत होता. संदिपने त्याच्या ऑफिस मधे 'राजमाची' चा बेत आखला होता, एकदा असेच त्याने मला दूसरा ऑप्शन सुचवण्यास सांगितले तेव्हा मी चावंड गडाचे नाव सुचवले. हा गड चढायला अत्यंत सोपा असून खुप अवशेष संपन्न आहे. संदिप आणि मी गडाची माहिती काढली (थोडी नेट वरुन व थोडी पुस्तकामधून). वर्णनावरून संदिपलाही गड भावला.
भेटीची तारीख: ८ ऑगस्ट २०१५
त्याने सगळ्यांनाआश्चर्याचा धक्का देत चावंड गडाचा कार्यक्रम आखला. आणि सरळ घोषित केले की हा फक्त boys only ट्रेक आहे. खरतर त्यांच्या या boys only ट्रेक मधे लहान मुले ही समाविष्ट असतात अगदी लहान
मुली सुद्धा. फक्त बायका समाविष्ट नसतात. पण या वेळेस मी हट्ट केला की मी येणारच. शेवटी संदिपने इ-मेल मध्ये एक वाक्य add केलेच. या वेळेसच्या ट्रेकला फॅमिलीसोबत येऊ शकतात. ५-६ लोकांनी नाव नोंदवले विथ फॅमिली. बहुतेक आमच्या घरासारखा हट्ट त्यांच्या घरून पण झाला असावा. फिदीफिदी फिदीफिदि… (LOL चे मराठी version)
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
चावंडगडाला प्रसन्नगड हे ही एक नाव आहे.
ट्रेक ८ ऑगस्टला ठरला. मी आतुरतेने ८ ऑगस्टची वाट बघत होते.एक दिवसाचाच ट्रेक असल्याने फारशी तयारी करायची नव्हती. ७ ऑगस्टला आम्ही बॅग भरून ठेवली. अखेर ८ ऑगस्ट उजाडला, मी सकाळी ५ ला उठून तयार झाले. जाई (माझी मुलगी) आणि संदिप तयार होई पर्यंत मी जाई साठी आणि इतर मुलांसाठी सुद्धा सॅंडविच बनवले. तेवढ्यात संदिपचा मित्र सुरेंद्र आणि त्याची बायको माही आले. अगदी आयत्यावेळी शिवराज संदिपचा मित्र देखील आम्हाला सामिल झाला. आमच्या सोसाइटीमधून सतीश आणि रंजीता दोन्ही मुलांसोबत आले. असे आम्ही मोठे ७ आणि लहान ३ मुले काळेवाडी फाट्यावरुन बस मध्ये बसलो. डांगे चौक, चिंचवड आणि चाकण वरुन काही लोक बसले. लहान मुले मिळून ३४ लोक होते.
राजगुरुनगरमध्ये बस डिझेल भरण्यासाठी थांबली. संदिप आमचा ट्रेक लिडर होता. तिथेच संदिपने घोषित केले की लवकरच आपण धाब्यावर नाश्त्यासाठी थांबू या. आणि येथूनच सगळ्या लेडीज बायका पुढे बसतील आणि मुले व पुरुष मंडळी मागे बसतील. का? अहो का काय विचरता धिंगाणा घालयचा होता ना.
आम्ही राजगुरुनगर नंतरच्या महादेव मिसळ हाऊस मध्ये नाश्त्यासाठी थांबलो. संदिप खामकर यांनी सर्वांसाठी इडली आणि चटणी आणली होती. ती फस्त करून पण सगळ्यांनी मिसळीवर ताव मारला. नंतर चहा आला. दुर्दैवाने सुधीर यांच्या घरून त्यांच्या बाबांना अस्वस्थ वाटू लागल्याचा फ़ोन आला. त्यामुळे त्यांची बायको व छोटी मुलगी परत घरी गेले.
बाकीच्यांचे खाणे आवरेपर्यंत मी जाईला एका झाडावर चढवले आणि नंतर त्या झाडावर चढायला मुलांचीच नाही तर मोठयांची पण रांग लागली. समोरच एक वडाचे झाड होते त्यावर सगळ्यांनी सूर पारंब्यांचा आनंद लुटला. पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली.
आता सिटिंग अरेंजमेंट बदलली होती. सगळ्या मूली पुढे बसल्या. हो… हो… मुलीच बायका वाटतो तरी का आम्ही फिदीफिदी फिदीफिदि… सगळ्या बॉयज गॅंगला नाचायचे होते पण एक गंमतच झाली. जो पेन ड्राइव लावला होता त्यात सगळी मिक्स गाणी होती. त्यामुळे एखाद्या डान्स नंबर गाण्यानंतर अगदी संथ गाणे लागत होते. जस्ट imagine चिकनी चमेली नंतर अचानक भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी असे गाणे होते. मग लोकांनी आपल्या मोबाईल मधली गाणी लावायला सुरुवात केली. पण गाडीतली aux केबल ख़राब होती. ती चेंज केली तर स्पीकरची वायर हलली त्यामुळे आवाज काही येईना. शेवटी वैतागुन एकाने असे सुचवले आमच्या ड्राइवर साहेबांना की फक्त हॉर्न तालात वाजवा आम्ही त्यावर पण नाचू फिदीफिदि…
नंतर जेव्हा सगळे व्यवस्थित झाले तोवर लोकांचा उत्साह ओसरला. तोवर नारायणगाव आले. नेहमीप्रमाणे
तिकडे ट्रॅफिक जॅम होते. सवयी प्रमाणे संदिप ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी खाली उतरला. थोड्या वेळात आम्ही ट्रॅफिक मधून बाहेर पडलो पण बस मोठी असल्याने संदिप साठी थांबायला जागा मिळेना. ड्राइवर दादा गाडी हळूहळू पुढे नेत होते. संदिप गाडी मागे पळत होता. थोडा असा चेस चालू असताना या पठ्ठ्याने सरळ एका दुचाकी स्वाराची लिफ्ट घेतली व् आमच्या पुढे आला. नंतर त्याला गाडीत घेऊन लवकरच आम्ही जुन्नर गाठले. तिकडे आम्ही एका हॉटेल मध्ये लंच ची ऑर्डर देऊन लगेच किल्ल्याकड़े कूच केले.
आता पाहू या चावंड किल्ल्याचा इतिहास…
इतिहास : (संदर्भ : http://trekshitiz.com/)
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले, त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले, त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुह्राण निजामशाह (इस १५९०-१५९४) हा सातव्या निजामाचा नातू . बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की,. त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत;
चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव.
मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला.
-:संदर्भ अहमदनगरची निजामशाही
मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकार्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले.
-: संदर्भ गुलशने इब्राहिमी
आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे, हे सिद्ध झाले निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला, राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
१) जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन
२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन
३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन
४) चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा. असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौखिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
५) चामुंडा हे देवीचे क्रूर रूप , या रुपात सर्व काही भयानक, अमंगल ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
६) सप्त मातृका म्हणजे ब्राम्ही, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते.
पुन्हा वळू या आमच्या गोष्टीकड़े:
चावंड गावात अगदी अरुंद रस्त्याने आमची बस पोहोचली. गावाच्या मध्यभागी एक शाळा आहे व गावात एका मंदिरा समोर भरपूर मोठी जागा होती. तिकडे आम्ही बस पार्क केली व सगळे खाली उतरले. पावसाने पण हजेरी लावली होती. आमच्याकडे रेनकोट होते पण लहान मुलांनी रेनकोट घालण्यास नकार दिल्यावर आम्ही मोठ्यांनी पण रेनकोट वर बहिष्कार टाकत पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटायचे ठरवले. शाळेच्या मागूनच किल्ल्याला वाट होती. थोडे चढून गेल्यावर अगदी ५ मिनिटांत आम्हाला छान पायऱ्या लागल्या. किल्ल्याच्या पायथ्या पासून तर अगदी वर पर्यंत छान पायऱ्या आहेत. या पायऱ्यांचे नूतनीकरण अगदी अलीकडेच झाले आहे. असे मला वाटत होते. आणि पहिल्या पायरीवर तसे कोरले देखील आहे. "जुन्नर वनविभाग २०१२-२०१५" आम्ही आता पायऱ्या चढू लागलो. पायऱ्या चढतांना आमचा ग्रुप ३ विभागात विभागला गेला. बच्चा पार्टी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक. बर हे ग्रुप वयानुसार नसून ते चढण्याच्या स्पीड वर होते. मी आणि जाई बच्चा पार्टी मध्ये होतो. पायऱ्या सुद्धा तीन टप्प्यांत विभागल्या गेल्या आहेत. पहिला टप्पा: जिथे पायऱ्यांचे नूतनीकरण झाले आहे. येथे पायऱ्या भरपूर रुंद आहेत. अगदी पुण्यातील पर्वती सारख्या. दूसरा टप्पा जिथे एका बाजूला कड़ा आहे आणि एक बाजूला दरी. आणि या कड्यांमधे अरुंद अशा पायऱ्या आहेत. पण एका बाजूला भक्कम रेलिंग आणि दुसऱ्या बाजूला दोरी असल्याने भ्यायचे तसे काही कारण नाही. पण पुस्तकात आणि ज्या साईट वरुन आम्ही माहिती काढली त्यात जुने वर्णन आहे. तेव्हा हे रेलिंग आणि दोरी वगैरे नसतांनाचे वर्णन होते. त्यावरून तेव्हा त्या चढणे आणि उतरणे देखील हे सुद्धा एक दिव्यच असेल याची मला कल्पना आली. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायर्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायर्या चढताना दिसतात. आम्हाला पण एक छोटी तोफ या पायऱ्यांच्या सुरुवातीस खड़कात रोवलेली दिसली.
चावण्डवाडीतून दिसणारी गडाची तटबंदी.
पायऱ्यांचा तिसरा टप्पा

तिसरा टप्पा जिथे पायऱ्या रुंद आहेत पण या जुन्याच आहेत. जरा ओबडधोबड आणि दोन पायऱ्यांमधले अंतर थोडे जास्त होते. पावसाचे पाणी या पायऱ्यावरून वाहत असल्याने या जरा शेवळल्या होत्या. आमच्यातील एका छोट्या मुलीने पायऱ्या मोजल्या. तिच्या अंदाजे ४६० होत्या. पायऱ्या संपल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे.
किल्ल्यावर सगळीकडे व्यवस्थित पाट्या लावल्या होत्या. एका ठिकाणी "सदर" अशी पाटी होती. सदरेचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बर्याच वास्तू दिसतात (जवळ जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश इथे आहेत) , म्हणून असा निष्कर्ष काढता येइल की इथे मोठी वस्ती असावी.आजुबाजुच्या परीसराचा मुलकी कारभार या गडावरुन चालत असावा.जेथे चौथरा शिल्लक आहे, तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत.

सदरेसमोरील पाण्याचे टाके
गड माथ्यावर चढताना
सदर पाहून उजवीकडे गेल्यावर वाङा लागतो. तिकडून वर उजवीकडे गड माथ्यावर चामुंडा देवीचे मंदिर आहे. आम्ही तिकडे निघालो. गडमाथ्यावर जाणारी वाट अतिशय निसरडी झाली होती. शेवटी कसे बसे आम्ही वर पोहोचलो. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी . जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.दुपारचे १२.३० वाजून गेले होते. मंदिरा पाशी आम्ही एक छोटा खाऊ ब्रेक घेतला. लहान मुलांना सॅंडविच आणि सगळ्यांना शेंगदाण्याचे लाडू वाटले. मग वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटोसेशन झाले. येथेच संदिपला आणि मला काही प्लास्टिकचा कचरा केलेला दिसला. तो आम्ही गोळा केला व पिशवीत भरला. तो कचरा आपण केला असो अथवा नसो पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
या मंदिरासमोर देवीकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजव्या हाताला हडसर किल्ला दिसतो. देवीच्या मंदिरामागे शंभु महादेवाचा डोंगर आहे. वरुन माणिकडोह धरणाच्या जलशयाचे विहंगम दर्शन होत होते. हे धरण कुकडी नदीवर आहे.
शम्भू महादेवाचा डोंगर
आम्ही आता गडमाथ्यावरुन खाली उतरु लागलो होतो. वर नमूद केल्यानुसार वाट निसरडी असल्याने बरीच गर्दी झाली. म्हणून आम्ही थोडे मागे थांबलो. आमच्यातील एक जण घसरला पण तो पडला नाही. तो तर बसला होता. त्याच्या म्हणण्यानुसार बर का… फिदीफिदी फिदीफिदी....पुढे गेलेली मंडळी सरळ गड उतरायला निघाली. आम्ही खूप आवाज दिला पण त्यांनी मागे पाहिले नाही. आता आम्ही ७-८ मागे राहिलो. गड माथा उतरून खाली आल्यावर आलेल्या रस्त्याने न जाता पुन्हा उजवीकडे गेल्यावर पुष्करणीकड़े जायला वाट आहे. तिथे पाण्याचे एक टाके होते. तिथेच जुने शंभु महादेवाचे मंदिर होते. मंदिर भग्न अवस्थेत असूनही त्याच्या अवषेशांवरून त्याच्या वैभवकाली इतिहासाची ग्वाही देत होते.
त्याची रचना अशी होती.

गाभाऱ्यातील भग्न शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर आपल्याला सभामंडप न दिसता पाण्याचे कुंड दिसते. व शेजारीच गोमुख दिसते. या वरुन संदीप आणि माझ्यात मतभेद झाले होते. संदिप म्हणत होता की पहिल्यापासून येथे कुंडच असणार मी म्हणत होते की नाही पुढे सभामंडप असणार आणि आता त्याचे छप्पर तुटल्याने तेथे पाणी साचुन कुंड तयार झाले आहे. पण ज्या अर्थी समोर गोमुख आहे त्या अर्थी संदिप म्हणतोय तेच खरे आहे. ते कुंडच असणार. समोर गोमुखातून सारखे पाणी झिरपत कुंडात पडत होते. प्रवेशद्वारपाशी आणि गाभाऱ्यापाशी सुंदर दगडी कोरिव कमान होती. त्यावर सुंदर कोरिवकाम होते.

पुष्करणी (गोमुख डावीकडे )
गाभारा आणि कमान
गडाचा आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. पावसामुळे रानगवत माजले होते त्यामुळे वाट शोधावी लागत होती. कड्याजवळच तटबंदी दिसली. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. इशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. आम्ही गुहेकडे जायला निघालो. या गुहांकडे जातांना आम्हाला एक नैसर्गिक झरा लागला. आम्ही त्या झऱ्याचे पाणी प्यायलो. एवढी सुंदर आणि गोड चव होती त्या पाण्याला अहहा....
आम्ही गुहपाशी गेलो. या गुहा म्हणजे बहुधा पहारेकर्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत होती. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.
गुहेकडे जाणाऱ्या पायऱ्या
आम्हाला अजुन सप्तमातृकांचे दर्शन घ्यायचे होते पण त्याची वाट सापडत नव्हती. गुहा पाहून परत वर त्याच वाटेने आम्ही परत वर आलो. एका खडकपासून उजवीकडे एका ठिकाणी चिर्याचे दगड थडग्यासारखे रचून ठेवले दिसले. संदिप म्हणाला तुम्ही व्हा पुढे मी तिकडे जाऊन पाहून येतो की वाट सापडते का ते, आणि तिथे जाऊंन आम्हाला पुढे येण्याचा इशारा केला.आम्ही ५ जण गेलो परन्तु एकाने दगडांकडे पाहून यायचे टाळले. जर आम्हला ती वाट सापडली नसती तर आम्ही एका अद्वितीय सौंदर्याला मुकणार होतो. आम्ही सगळे त्या दगडांवरून पुढे गेलो आणि आम्हाला सप्तमातृकांचे दर्शन झाले. या सप्त मातृका म्हणजे एकाला एक अशी लागून सात पाण्याची टाकी आहेत. (यांची नावे वर नमूद केली आहेत.) विशेष म्हणजे या सातही टाक्यांच्या पाण्याची पातळी वेगवेगळी होती. एकाने खोलीचा अंदाज घेण्यासाठी दगड टाकला तर खोलीपण वेगवेगळी होती. या टाक्या कातळी बांधाने एकमेकांपासून वेगवेगळ्या केल्या आहेत. आता कालांतराने मधल्या भिंतीना छिद्र पडली होती. मी फ़क्त एकाच बांधावर जाऊ शकले. संदीप व केदार यांना पोहता येत असल्याने ते सगळ्या बांधावर जाऊन आले. एका बांधावर तर रांजण खळग्यांनसारखे खळगे पण होते. एका बांधावरून पूर्वेच्या बाजूला एक कमान दिसली मग आम्ही सगळे तिकडे गेलो. तिथे कमानी ख़ालून सुंदर पायऱ्यांची वाट पहिल्या कुंडात उतरत होती , कमानीवर एक सुंदर गणेश मूर्ति कोरलेली होती. आणि याच कमानी पासून पूर्वेला मळलेली वाट आम्हाला सापडली जी की मुख्य वाटेला जाउून मिळते. एक जण जो आधी आला नव्हता तो ही मग या वाटेने कुंड बघायला आला.
नंतर आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा प्रवेश द्वारापाशी आलो. गडाच्या पूर्व भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. त्यामुळे एका बाजूने सुंदर असणारा चावंड गड दुसऱ्या बाजूने अगदी एखाद्या पित्यासारखा राकट भासतो. तस पाहता गडावर एक पूर्ण फेरी (रिंग रोड ) मारता येते पण वेळेअभावी आणि वाटेवर खूप उंच गवत वाढल्यामुळे आम्ही त्या बाजूने गेलो नाही.
विहंगम सप्तमातृका
सप्तमातृकांपासून दिसणारे मणिकड़ोह धरणाचे दृश्य
हे सगळे बघायला आणि प्रत्येक ठिकाणी फोटोशेशन करायला यामुळे आम्हाला तासभर उशीर लागला. खाली गेलेली मंडळी काळजी करत होती. मोबाइलला रेंज नसल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. खाली गेलेल्या मंडळींमध्ये आमची जाई पण होती. आई आणि बाबा दोघे नसल्यामुळे तिचा रडवेला झालेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला. पायऱ्यांपाशी परत आल्यावर आम्हाला वरुन खाली आमची वाट पाहणारी मंडळी दिसली. ते आम्हांला हाका मारत होते. त्यातील एक आवाज माझ्या पिल्लुचा होता. ती अगदी कळवळून आई-बाबा अशी साद घालत होती. तिचा तो आवाज मला आणि संदीपला अस्वस्थ करत होता. मी संदीपला म्हणाले मी माझ्या स्पीडने उतरते तू जाई साठी पुढे जा. संदिपने पळतच गड उतरला. मग आम्ही सर्वांना त्यांनी काय मिस केले ते सांगितले. त्यांना वरचे विडिओ आणि फोटोज दाखवले. तोवर मागे राहिलेली मंडळी पण गड उतरून खाली आली.
गडाच्या दरवाज्यावरून दिसणारी उतरण्याची वाट
मंदिराच्या शेजारीच एक ओढा वाहत होता. त्या पाण्याचा खळखळ आवाज आम्हाला अस्वस्थ करत होता. तिकडे अगदी छोटा धबधबा पण होता. आम्ही ४-५ मंडळी त्या पाण्यात गेलो व सरळ त्या पाण्यात बसून घेतले. हळूहळू सगळेच जण आले. पाण्याचा थंडगार स्पर्श अंगावर शहारे आणत होता. मध्येच उन-पावसाचा खेळ चालू होता. उन पडले की जरा ऊब येत होती. पाण्यात यथेच्छ खेळल्यानंतर आम्ही पाण्याबाहेर आलो. पिल्लांना तर अक्षरशः उचलुनच बाहेर आणले. नशिबाने तिथे मंदिराजवळ जुन्या खोल्या होत्या त्यामुळे कपडे बदलायची सोय झाली. सगळे कपडे बदलून मेकअप वगैरे करून तयार झाले.
कुकड़ेश्वर मंदिर
गाभारा
मंदिरावरचे सुन्दर कोरिवकाम
मंदिराच्या बाजुलाच असणारे छोटे मंदिर- तिथे मानवीय सापळ्यासारखी एक मूर्ति
गोमुख आणि कुंड
मंदिराच्या मागे डोंगरात दिसणारा धबधबा
एव्हाना ५ वाजून गेले होते. अजुन जेवण बाकी होते. हॉटेलवाल्याला फोन केला की आम्ही १० मिनिटांत पोहोचत आहोत जेवणाची तयारी करून ठेव. १०-१५ मिनिटांत आम्ही जुन्नरला पोहोचलो. हॉटेलमध्ये सगळी जेवणाची तयारी झाली होती. सगळे भरभर जेवायला बसले. १०-१५ मिनिट कोणीच कोणाशी बोलले नाही सगळे जेवण करण्यात मग्न होते. जरा जठराग्नि शमवल्यावर परत दंगा सुरु झाला.
परत येताना मात्र बरीच मंडळी निद्राधीन झाली होती. आमच्यातील एक पिल्लू मात्र फ्रेश होते. तिचे नाव दिव्यांशी. ३ वर्षाची होती. तिला आमची जाई दीदी खूप आवडली होती. ती निरागसपणे जाईची कॉपी करत होती. जाईला पण ती खूप आवडली. जाईला ट्रेक मध्ये बरेच मित्र-मैत्रिणी मिळाल्या.
७-७.३० ला आम्ही मंचरच्या पुढे एक चहा ब्रेक घेतला. तेव्हा समजले की मागची मंडळी जागीच होती व आपापल्या बालपणीच्या आठवणी एकमेकांना सांगत होती. चहा घेऊन परत प्रवासाला सुरुवात झाली. चाकणला आल्यावर अपूर्वा आणि अद्वैतच्या आईने आमच्या सर्वांसाठी कॉफी आणली होती. आम्ही कॉफ़ी घेऊन पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ झालो. ९.३० ला सगळ्यांचा निरोप घेऊन घरी पोहोचलो. असा झाला आमचा सुंदर चावंड ट्रेक.
पुन्हा भेटू या अशाच एका रमणीय दिवसाची आठवण घेउन. stay tune…
Main page मुख्य पान